Monday, July 26, 2021

मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!लक्ष्मीकांत देशमुख( माजी सम्मेलनाध्यक्ष) 9325297509laxmikant05@yahoo.co.in

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तआजच्या सामना दैनिकाच्या"मराठी टणत्कार" या  विशेष पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख
"मराठी ज्ञान, रोजगार आणि अभिजात होण्याची त्रि सूत्री ".
 मी सदर लेखात
1) मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा
2) विज्ञान- तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीत इंग्रजीसोबत उपलब्ध असणे
आणि
3) उत्तम अभिजात साहित्य इंग्रजी, हिंदीसह अन्य भारतीय व परकीय भाषेत नेण्यासाठी अनुवाद केंद्र स्थापणे
   अशा तीन विषयाचा उहापोह केला आहे.

सदर लेख खाली देत आहे.

मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

लक्ष्मीकांत देशमुख( माजी सम्मेलनाध्यक्ष)
9325297509
laxmikant05@yahoo.co.in

       नवे आघाडी सरकार  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यापासून मराठीला "अच्छे दिन" - चांगले सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणायला कांही हरकत नाही.  मराठी भाषा विभाग  स्थापन झाल्यापासून  काल परवा पर्यंत  सरकारसाठी व लोकांसाठी पण हा विभाग  दखलपात्र नव्हता, पण सुभाष देसाई यांनी या विभागाचे मंत्रिपद स्वीकारल्यापासून विभागाने कात टाकली असून तिला नवी झळाळी व महत्व प्राप्त झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाचे संकट असतानाही मराठी भाषेच्या विकासासाठी आघाडी सरकारने  तीन महत्वाचे दूरगामी विधायक परिणाम   होण्याची क्षमता असणारे निर्णय घेतले(त्यात दोन कायदे अंतर्भूत आहेत) , त्यासाठी सुभाष देसाई यांनी लक्ष घालून व मराठी भाषा व साहित्यात काम करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हे निर्णय घेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या मागे  मराठी प्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भक्कम पाठिंबा होता, हे उघड आहे. शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठीच्या व मराठी भाषिकांच्या रक्षणासाठी झाली आहे, त्यामुळे हे  निर्णय  होणे अपेक्षित होते. त्यांचे मराठी नागरिकांत चांगले स्वागत झाले आहे.  ही मराठी भाषा विकासाची दमदार सुरवात असली तरी पुरेशी नाहीय. त्यासाठी आणखी कांही महत्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे. ते कोणते हे  या लेखात मी संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी मागील दीड वर्षात जे  तीन महत्वाचे  निर्णय सरकारने घेतले, त्याचे महत्व व होणाऱ्या  दूरगामी परिणामा बाबत थोडा उहापोह होणे आवश्यक आहे.
   
        आघाडी सरकारच्या वतीने 2020मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला ( 26 फेब्रुवारी)म्हणजेच मराठीचा मानबिंदू व महाराष्ट्र भूषण असणाऱ्या ज्ञानपीठकार कवी कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मराठी सक्तीचा कायदा म्हणजेच  इंग्रजीसह सर्व भाषिक माध्यमांच्या व सर्व मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना  मराठी अनिवार्यपणे शिकवण्याचा कायदा  एकमताने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. हा कायदा करून  सरकारने आपली मराठी भाषेबाबतची बांधिलकी किती बावनकशी आहे हे दाखवून दिले आहे. हा कायदा महाराष्ट्राचा सर्व लोकव्यवहार संपूर्णपणे मराठीत होण्यासाठी खऱ्या अर्थाने "गेम चेंजर" ठरणार हे पुढील कांही वर्षातच सिद्ध होईल यात शंका नाही. या कायद्यासाठी मागील सरकारला जाग यावी म्हणून "मराठीच्या भल्यासाठी" या मंचातर्फे 2019 मध्ये जून महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही लेखक, कलावंत,शिक्षक व चित्र-नाट्य कलावंतांनी एक धरणे आंदोलन केले होते, पण त्याची खऱ्या अर्थाने दखल घेतली ती शिवसेनेचे त्या युती सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या मराठी प्रेमी  सुभाष देसाई यांनी. त्यांच्या पुढाकारामुळे व मुख्यमंत्र्यांच्या अस्सल मराठी प्रेमामुळे  नवे सरकार स्थापन होताच हा कायदा तातडीने  संमत झाला.  
    आम्हा मराठी प्रेमी साहित्यिक व कलावंतांची दुसरी मागणी होती ती मराठी विद्यापीठाची. त्यासाठी प्रस्तुत लेखकाने  "आता मराठी विद्यापीठ स्थान होणे काळाची गरज" असा एक लेख या वर्षीच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काळात  "महाराष्ट्र टाईम्स" मध्ये लिहिला होता. त्याआधारे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत हा प्रश्न  उपस्थित केला आणि मुख्यमंत्रांच्या संमतीने शिवसेनेचे कार्यक्षम  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी सरकारने मराठी विद्यापीठ स्थापनेला  तत्वतः मान्यता दिल्याची विधीमंडळात घोषणा केली व त्यासाठी एक समिती गठीत केली जाईल असेआश्वासन दिले. त्यामुळे येत्या वर्षभरात मराठी विद्यापीठ
 स्थापनेचा प्रश्न सुटेल हे नक्की!
       
      आणि मागच्या आठवड्यात मराठी राज्यभाषा विधेयक 1964 मध्ये आमूलाग्र सुधारणा करणारे   "मराठी राज्यभाषा ( सुधारणा) विधेयक 2021 "तयार केले असून ते पुढील अधिवेशनात मंजूर होईल यात शंका नाही.  सदरचे विधेयक रमेश पानसे व अन्य मराठी भाषा तज्ञ व्यक्तीची समिती नेमून त्या आधारे मराठी भाषा विभागाने  बनविले आहे. त्याद्वारे शासनाचा मंत्रालय ते ग्रामपंचायत असा सर्व विभाग व राज्यांच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामंडळांचे सर्व कामकाज, पत्रव्यवहार आणि लोकसंवाद मराठी आणि फक्त मराठीतून होईल.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस एम जोशी, शाहीर अण्णा  भाऊ साठे, अमर शेख आदींनी" लोकभाषेत लोकांचे शासन असणारे महाराष्ट्र राज्य" हे जे स्वप्न पाहिले होते, ते आता खऱ्या अर्थाने पूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. प्रत्येक  जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी व  मराठी भाषा समिती गठीत करणे व  सर्व दुकाने व आस्थापनांना परवानगी देताना मराठी नामफलकांची अट असणे आणि सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी "मराठी निपुणता"अहर्ता बंधनकारक असणे  आदी सुधारणा अत्यंत स्वागतार्ह आहेत.  एकूण हे सुधारित राजभाषा विधेयक क्रांतिकारी आहे असे  अभ्यासा आधारे ठामपणे मी म्हणेन!
    
      कोरोना काळात मराठी विकासाची ही पहिली त्रिसूत्री अत्यंत महत्वाची आहे हे मान्य करूनही असे म्हणावेसे वाटते की हे तीन निर्णय मराठी भाषेच्या विकासासाठी आणि ती ज्ञान, रोजगार व लोकव्यवहाराची भाषा होण्यासाठी  पुरेसे नाहीत.आम्ही "मराठीच्या भल्यासाठी" या मंचाखाली एकवटलेल्या 24 भाषा, साहित्य व कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी वेळोवेळी निवेदने देऊन आणखी कांही पाऊले राज्य शासनाने टाकावीत असे आग्रहपूर्वक सांगितले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मागील पाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जे ठराव झाले त्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तरी बरेच कांही साध्य होऊ शकते.
    
    आज मी माजी संमेलनाध्यक्ष म्हणून व "मराठीच्या भल्यासाठी" मंचाने जे विचार पूर्वक निवेदन शासनाला यापूर्वीच  दिले आहे,त्या आधारे मराठी भाषा विकासाची एक नीलप्रत ( ब्लू प्रिंट) अथवा आराखडा  या लेखात संक्षेपाने मांडत आहे.
     
      सदर मराठी भाषा विकास आराखड्यात वर नमूद केलेले व संमत झालेले तीन निर्णय समाविष्ट असून पुढील कांही कार्यक्रम शासनापुढे व मराठी माणसापुढे  विचारार्थ  ठेवीत आहे. त्यामागे भाषा विकासाचे काम प्रथमतः व अंतिमतः पण राज्यसंस्थेचे आहे. साहित्य व भाषा विषयक काम करणाऱ्या संस्था पथदर्शक प्रकल्प हाती घेऊ शकतात, पण त्याचा राज्यभर विस्तार( अप स्केलिंग) करायला शासन नामक यंत्रणाच हवी, हे प्रशासनात 35 वर्षे काम केलेला  प्रशासक आणि तेवढीच वर्षे साहित्य संस्थांतही काम करणारा साहित्यिक  या दुहेरी अनुभवाच्या आधारे  हे  अधोरेखित करू इच्छितो.  लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकशाही व्यवस्थेत शासन व विधी मंडळ या संस्था निर्माण केल्या आहेत म्हणून त्यांच्या कडून  अपेक्षा  ठेवण्यात कांही गैर नाही.
    
      सध्याच्या शासनाने मराठीसाठी वर नमूद केलेल्या निर्णयामुळे आम्हा मराठी साहित्यिक कलावंतांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे पुढील तीन वर्षात मराठी भाषा विकासाचे पुढील  कार्यक्रम सरकारने क्रमशः हाती  घेऊन त्याबाबत शासन निर्णय वा कायदा केला तर मराठीचा लौकिक अधिक मोठ्या प्रमाणात वाढेल व भारतीय पातळीवर तिला तिचे रास्त असलेले उच्च स्थान व महत्ता निश्चितच प्राप्त होऊ शकेल.
     
      राज्य सरकारचा सर्व कारभार मराठीतून चालावा म्हणून संमत केलेले राज्यभाषा( सुधारणा) विधेयक 2021 आवश्यक आहे, पण ते पुरेसे नाही. कारण राज्य शासनापालिकडे केंद्रीय संस्था जशा बँका, पोस्ट , रेल्वे, केंद्राचे सार्वजनिक उपक्रम, खाजगी कारखाने, व प्रतिष्ठाने ( उदा. शेअर बाजार, वित्तीय संस्था, मनोरंजन जगत इत्यादी ) येथील व्यवहार व संवादाची / संपर्काची भाषा इंग्रजी किंवा हिंदी प्रामुख्याने आहे. त्यांना राज्यभाषा ( सुधारणा) विधेयक 2021 लागू होत नाही, त्यासाठी आम्ही शासनाकडे "मराठी भाषा विकास प्राधिकरण" या नावाचा कर्नाटका राज्याच्या "कन्नड भाषा प्राधिकरण" ( The Kannad Language Authority)  कायद्याप्रमाणे बनवावे अशी  मागणी गेली कांही वर्षे "मराठीच्या भल्यासाठी" हे मंच आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करत आहे. एवढेच नव्हे तर सदर  कायद्याचे एक प्रारूप तज्ञ भाषा अभ्यासक , विधिज्ञ आणि माजी न्यायमूर्तींच्या सहकार्याने बनवून मराठी भाषा विभागाला  आम्ही सादर केला आहे. प्रस्तावित मराठी भाषा विकास प्राधिकरण कायद्यामुळे केंद्र शासनाची कार्यालये व खाजगी आस्थापना ही कायद्याच्या कक्षेत येतील व तेथे मराठीमध्ये म्हणजेच बहुसंख्यांकांच्या भाषेत कारभार, संपर्क व संवाद होण्यास  त्यांना बाध्य करता येईल. एक उदाहरण देऊन हे प्रस्तावित मराठी भाषा विकास प्राधिकरण  सर्वदूर मराठीकरणा साठी कसे  प्रभावी प्रभावी ठरू शकते हे सांगतो.  राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी व्यापारी व विदेशी बँकांचा व्यवहार हा प्रामुख्याने इंग्रजी मध्ये( व थोडाफार हिंदी भाषेत) चालतो. साधे चेकबुकही इंग्रजीव हिंदीत असते. खातेधारकाचे नावही इंग्रजीत छापलेले  असते. ते महाराष्ट्रात बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असताना स्थानिक भाषेत चेकबुक का मिळू नये? आज बँकांना त्यासाठी फार तर आपण  विनंती करू शकतो, पण त्या ऐकतातच असे नाही. मराठी भाषा प्राधिकरण कायदा झाला तर त्यांना आदेश देऊन त्यासाठी बाध्य करता येईल. एकूणच सदरचे  मराठी प्राधिकरण राज्यशासनाच्या संस्थांच्या बाहेर असणाऱ्या केंद्र व खाजगी संस्थांचे बहुसंख्य व्यवहार व कामकाज मराठीत करण्यासाठी कायद्याने सक्तीचे करू शकते. अन्यथा आर्थिक दंड व प्रसंगी टाळे लावणे असे कठोर आदेश पारित  शकते, ज्यांची जिल्हाधिकारी  किंवा पोलीस अधिक्षकामार्फत  अंमलबजावणी करता येऊ शकते.  संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मात्यांचे महाराष्ट्र राज्य हे मराठी  भाषिक राज्य व्हावे हे स्वप्न व ध्येय राज्यभाषा ( सुधारणा) विधेयक व मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा या दुहेरी इंजिनानेच सर्वार्थाने साकार होऊ शकेल.
    
     मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी मराठी विद्यापीठ महत्वाचे आहे, पण त्याही पेक्षा उच्च शिक्षण( महाविद्यालयीन व विश्वविध्यालयीन) मराठीत उपलब्ध होणे आवश्यक आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळात हैद्राबादच्या निझामाच्या संस्थानात 1940च्या दरम्यान वैद्यकीय ( एम. बी. बी. एस.) आणि विधी ( एल एल बी) शिक्षण उर्दू मध्ये घेता येत होते. आजही मराठवाड्यात व खास करून  हैदराबाद शहरात् नव्वदी पसार केलेले कांही उर्दु मधून शिकलेले डॉक्टर्स व वकील  हयात आहेत. त्यासाठी निझाम सरकारने त्याकाळी सर्व वैदयकीय व विधी पदवी शिक्षणाची सर्व  इंग्रजी पाठ्यपुस्तके व संदर्भ  ग्रंथ उर्दूत खास विभाग स्थापून अनुवादित करून घेतले होते. माझे दिवंगत सासरे उर्दूतून एल एल बी झाले होते. म्हणजे इच्छा  व व्हिजन असेल तर मराठीतून उच्च शिक्षण देणे अवघड नाही. आता आय आय टी व अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठीसह  प्रादेशिक भाषेतल्या  शिक्षणासाठी केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्र शासनाकडून हीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे ज्यांचे इंग्रजीवर फारसे प्रभुत्व नाही, पण त्यांना विज्ञान, तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण आवड व करिअरसाठी घ्यावयाचे आहे, त्यांना मराठीतून सदरचे शिक्षण प्राप्त होण्याचा मार्ग प्रशस्त होईल. तसेच  ते आनंदाने  घेऊन उच्च करिअर घडवू शकतील. त्यासाठी शासनाने दोन गोष्टी करणे  आवश्यक आहे.  एक विज्ञान विद्या शाखांचे  उदा. रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र,  वाणिज्य, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व वैद्यकीय विषयाचे इंग्रजी टू मराठी असे पारिभाषिक  शब्द कोष तयार करणे व या सर्व विद्याशाखांची विहित सर्व पाठ्यपुस्तके व संदर्भ ग्रंथ   वापरून मराठीत अनुवादित कारून उललब्ध करून द्यावे व  विद्यार्थ्यांना मराठी का इंग्रजी  मध्यम याची निवड करण्याची मुभा दिली गेली तर आज इंग्रजीच्या  निकृष्ट दर्जाचे शिक्षणामुळे इंग्रजीवर प्रभुत्व नसणाऱ्यांना वरील सर्व विद्या शाखांचे उच्च शिक्षण मराठीत घेता येईल. हे काम मराठी विद्यापीठाला द्यावे किंवा  त्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक भाषांतर विभाग सरकारने स्थापून हे काम  करावे. या स्वरुपाचा शासन निर्णय मराठी ही ज्ञान भाषा होण्यासाठी  सहभाग नोंदवेल.
    
       मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे प्रकरण केंद्राच्या दरबारी अभिजाजतेचे सर्व निकष पूर्ण असूनही लटकत पडला आहे.  तो दर्जा समज मिळाला नाही( तो मिळालाच पाहिजे या साठी मीही आग्रही आहेच) तरी मराठी भाषा व साहित्याच्या महत्तेत कांही फरक पडत नाही. कारण ज्ञानेश्वर - तुकोबाची मराठी अभिजात व समर्थ्यसंपन्न आहेच आहे. पण देशपातळीवर जो मान कन्नड, तामिळ ,बंगाली या भाषांना मिळतो, तो तेवढा व तसा मराठीस मिळत नाही, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. सदरचे सत्य  एकाच उदाहरणाने स्पष्ट करता येईल. मराठीला आजवर चार ज्ञानपीठ मिळाले आहेत, तर कन्नड भाषेला त्याच्या दुप्पट म्हणजे आठ. कन्नडच्या तुलनेत मराठी साहित्य कुठेही कमी नाही, पण ते देश पातळीवरवर कन्नड इतके पोहचत नाही. त्याचे कारण आहे उत्तम दर्जेदार व कलात्मक मराठी पुस्तकांचे इंग्रजी व हिंदी ( आणि इतर प्रादेशिक भाषेत) मध्ये ते सकस अनुवादचया रूपाने विस्तृत संख्या व प्रमाणात पोचत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर  किती  तरी साहित्य अकादमी पारितोषिक , राज्य शासन आणि महाराष्ट्र फौंडेशन सारख्या संस्थांचे पारितोषिक प्राप्त पुस्तकांचे इंग्रजी व हिंदी अनुवाद ख्यातनाम प्रकाशन संस्थांकडूनन  कातून घेतले पाहिजे.या उलट गिरीश कार्नाड, भैरप्पा, पेरूमल  मुरुगन आदींची सर्वांच्या सर्व पुस्तके इंग्रजीत आली आहेत. हे भाग्य  जी.ए. कुलकर्णी, श्याम मनोहर, रंगनाथ पठारे आदींच्या साहित्यकृतींना का लाभत नाही? उत्तर एकाच. अनास्था. त्यामुळे जेंव्हा समाज व नागरिक कर्तव्यचुत होतात, तेंव्हा शासन संस्थेने प्रभावी हस्तक्षेप करायचा असतो. मराठीच्या महत्तेची ओळख सर्वदूर देशपातळीवर न्यायची असेल तर मराठी भाषा विभागाने पूज्य साने गुरुजींच्या कल्पनांनावर आंतर भारतीची पुनर्स्थापना केली पाहिजे.   या सुचनेच्या स्वीकार व कार्यवाही होण्यासाठी एक  "भारतीय भाषा अनुवाद मंडळ" साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या धर्तीवर स्थापन करण्यात यावे आणि त्या मार्फत दरवर्षी मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके निवडून त्याचे इंग्रजी, हिंदी व इतर भाषात अनुवाद करून घेणे, त्यासाठी अनुवादकांची एक मोठी फळी निर्माण करणे व ख्यातनाम  भारतीय स्तरावरील प्रकाशकांशी सामंजस्य करार करून ती छापणे ,त्यांची प्रसिध्दी व मार्केटींग करणे हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला पाहिजे.
    
     या  सुचवलेल्या तीन नव्या उपक्रमांमुळे मराठी ही ज्ञान- विज्ञान, रोजगार व लोकसंवादाची खऱ्या अर्थाने भाषा होऊ शकेल आणि अनुवाद मंडळामुळे मराठीची महती, तिचा अभिजातपणा व साहित्यातील दर्जेदारपणा देश व जागतिक पातळीवर जाण्यास मोठी चालना मिळेल. 
   
      महाराष्ट हे मराठी भाषिक व मराठी सांस्कृतिक राज्य आहे. म्हणून राज्याचे मराठीपण टिकवणे,  मराठी ओळख ठसठशीत करणे आणि मराठी अस्मिता पुरेशी टोकदार करणे हे मराठी भाषा विभागाचे व एकूणच राज्य शासनाचे  अग्रक्रमाचे धोरण असले पाहिजे . आघाडी सरकारच्या तीन वर्षांच्या उर्वरित काळात ही तीन कामे झाली तर यशवंतराव चव्हाण यांनी  "मराठी भाषा व संस्कृती दिमाखात राजसिंहासनावर  विराजमान झालेली  आहे"  हे पाहिलेले स्वप्नआपणा समस्त मराठी जनांना सर्वार्थाने साकार झालेले पहावयास मिळेल.

Saturday, July 24, 2021

एकत्र कुटुंब

*एकत्र कुटुंब*

मित्र हो, 
आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या भागात म्हणा, आपण प्रतेक जण ह्या परिस्थितीतून गेलोय,मग भले तो काळ 1990 वर्षापूर्वीचा असो किंवा आताचा असो, ह्याचा सगळ्यांना अनुभव आलेला आहे,
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये घरात एक आज्जी असायची,तिच्या जवळ पेटीची चावी असायची, त्यात मग घरात लागणारे साहित्य ठेवलेले असायचे, पूर्वी साखर शेर्षाची साखर म्हणून पोती च्या पोती मिळायची, जेवढे घरात शेयर तेवढी साखर, पाच रुपये किलो प्रमाणे भेटत असे, लहान लहान मूल येता जाता साखर खात असत म्हणून पेटीत ठेवत असत, त्यात मग तेल, साखर,निरमा पावडर, साबण, मसाले, पार्ले जी बिस्कीट असा सगळा बाजार भरलेला असायचा, कधीतरी आपण जाऊन पेटी उघडली की हा सगळा वास मिक्स होत असे, आणि नाकाला झोंबत असे,

घरी पाहुणा आला की घरात असलेली सूनबाई आज्जी कडे चावी घेऊन ये म्हणून पाठवत असे,त्यात त्या आज्जी ची करडी नजर असायची, भांड्यात तेल जास्त पडले की मागून हळूच ठोमना मारून सुनेला समझ देत असे,
काही ठिकाणी दूध जास्त ठेवलेले असायचे ,नसेल तर वाटी घेऊन बाजूच्या शेजारच्या घरात पाठवणे, हा प्रकार जास्त असायचा, 
घरचा जावई अचानकपणे आला असेल तर सासूबाई आजू बाजूला गल्लीत गावठी अंडी हुडकून आणून त्याला जेवण घालत असतं, आता फोन मुळे सहज शक्य आहे,अगोदर कळवतात,त्यामुळे चिकन मटण सोय होतेच,

सकाळी बाहेर जाणारे असतील तर त्यांना डब्बा द्यावा लागे, म्हणून जेवण बनवणारी सून ही पर्मनंट जेवण बनवत असे, बाकीच्या सूनानी मग गोठ्यात , शेतात, अशी कामे असत,
एकटीच्या हातची जेवणाची सवय लागलेली असे, भाकरी करताना फार काळजी घ्यावी लागत असे, कारण 20 ते 25 जण एका कुटुंबात संख्या असायची, त्यांच्या सगळ्यांच्या भाकरी मोजून करताना म्हणजे तिचे बीचारीचे नाके नऊ वाजत असत, किमान दोन भाकरी म्हणजे सकाळी चुलीवर चालू झालेली भट्टी ही अकरा वाजे पर्यंत चालूच असायची, त्यात मग वडील मंडळी, म्हातारी मंडळी, नोकरी करणारे, आणि मग बच्चे कंपनी, म्हणजे त्या सुगरण बाईचे बारा वाजत असत, त्यात काही लोक केलेल्या भाजीला नावे ठेवत, नाक मुरडत भाकरी खात असतं,

त्यात सासूबाई चा जीव वरखाली होत असे,कारण दररोज सकाळ संध्याकाळ भाजी आणि भाकरी करणे म्हणजे पिठाचा डब्बा खाली जात असे, मग त्यात एका पोर्ग्याचे पोरं जास्त असली की एवढी कशा पोरं काढून बसोची म्हणून वरून फुले टाकत असत,

पण विचार करा, तुमच्या समोर चित्र उभा राहिले असेल,गरम गरम भाकरी करताना आपली आई, काकू, बहीण ह्यांचे किती हाल होत होते, आता सगळी कडे गॅस आलेत, एवढं त्रास नाही आणि कुटुंब पण मोठी नाहीत,
हम दो हमारे दो प्रमाणे आता विभक्त पद्धती आल्या,
पण मला एक सांगायचे आहे,
ज्या घरात एकत्र येऊन जेवण एकत्र होत नाही त्या घरात एक्की ही नसतेच आणि त्या घरात लवकर बरकत येत नाही, सकाळी लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात पण संध्याकाळी कुटुंबात सर्व लोकांची पंगत बसली पायजे, दिवसभरातील झालेल्या कामाची यादी, उद्या काय करणार, लहान मुलांनी केलेल्या करामती, ऐकायला भेटते,

आणि मुख्य म्हणजे केलेलं सगळे जेवण आपल्या सर्वांच्या समोर असते त्या मुळे कोणी किती खावं याचा अंदाज येतो, आणि सर्वजण खुश होतात, नाहीतर एकदा एकदा जेवण करणारी ला काहीच मिळत नाही, बिचारी ला जे आहे त्यात समाधान मानून खावं लागत,

त्या वेळी घरचालक जेव्हा बाजार गावी जात असे तर एवढया लोकांना काय घेऊन जाणार, मग चिरमुरे आणि खारा हा सर्वात कॉमन  मेनू, 
घरी आल्या आल्या सगळी लहान मूल आणलेला बाझार आगदी उत्सुकतेने बघत असत, मग चुरमुरे वाटणारा वाटत असे, आणि काही वेळा अंदाज न आल्यामुळे वाटणारा रिकामी राहून जायचा ,त्यात मग जे वाटून खात असत,त्यातले मग त्या वाटणाऱ्या ला देत असत,पण घरात असलेली आज्जी हीच कणा असे,
ती जेव्हा वाढेल तेव्हाच लोकांनी जेवायचं, मग कधी कमी जास्त वाढत असे, मग त्यात काही जण रुसवा फुगवे करणारे काही लोक असतात,
मुख्य म्हणजे मटण किंवा अजून काही पोळी जेवण असेल तर मग वाढणारी चे नाके नऊ होत असतं,

पण ती मज्जा आता नाही, 
सण असोत, इतर काही समारंभ असोत, पण ती मज्जा काही वेगळीच असायची,

त्यात काही चालक असे होते, ऐकून आम्हाला पण माहीत, त्या वेळी गुळाचे घणे होते, तो गूळ बेळगाव रविवार पेठेत जात असे, मग हे घरचालक  ती पट्टी म्हणजे पैसे आणण्या साठी म्हणून सकाळी पहिल्या गाडीने भाकरी बांधून जात असत आणि संध्यकाळी शेवटच्या गाडीने परत येत असत,
पण काही जण असे पण होते की, त्या नेलेल्या भाकरी न खाता मस्त पैकी हॉटेल वर जाऊन आगदी ताव मारून दिवसभर फिरून घरी,
घरी आल्यावर भाकरी का परत आणली म्हणून विचारलं तर खायला वेळ मिळाला नाही हे कारण ऐकायला मिळत असे,हे मग सगळे घानेमालक एकत्र कधीतरी बसलेले असणार, मग हे कुठे जेवले, कुठे पिले, कुटला सिनेमा बघितला हे सगळे बाहेर पडत असे,

काही चालक आपल्या सगळ्या कुटुंबातील व्यक्ती ना वर्षात एक दिवस नवीन कपडे शिवत असत, तो कपडा बेळगाव वरून आणला जात असे, शर्ट आणि चड्डी असे पांढरा आणि खाक्की कापड असे, तरी पण त्यात काही मुलांना वेगळे कापड, आणि काहीना मवुगर कापड असे असायचे, तरी पण कोणी काही बोलत नसे, वचक होती,पण आपल्या घरात ज्या राबणाऱ्या बायका असतात त्यांना कधीच ह्या लोकांनी नवीन साडी घेतली नसायची, गावात एकमेकाचे बघून पण लोक वागत असतं,बिचारी माहेरपन ला गेली तरच तिला नवीन साडी भेटत असे.

त्या वेळी एकटा घरचालक काय म्हणेल ते मग ते चुकीचे का असेना सर्वजण त्यांचा आदर करून काम करत असतं,पण काही लोक आपली मनमानी करून मग भावा भावात भांडण सुरू झाली आणि त्यात एकत्र कुटुंब पद्धती ही नाश पावली, आता सर्रास लोक सुशिक्षित आहेत, तरी पण तिघे चौघे भाऊ असले तरी, लग्न होई पर्यंत लई चांगले पण लग्न झाली की घरचा सत्यानाश होत आला, मग त्यात इर्षा वाढली, भाऊबंदकी वाढली, आणि आपल्या रक्त्याच्या नात्यात विळा कुराडी ची भाषा बोलू लागली,
गावचे काही पंच लोक असत,त्यांनी जे म्हणतील ते मुकाट्याने ऐकून घ्यावं लागतं असे, कोण आडवा बोलला तर त्याला व्हणा मारत असत, कारण ही पंच मंडळी बुजुर्ग असे, आणि रात्र रात्र भर काही कुटुंबात कलह असे तो कधीच संपत नसे, 
तरी पण हे लोक कधी चहा ची अपेक्षा न करता आपला फैसला सूनाऊन जात असत, मग ती भांडी असोत, घर असो, जमीन असो,जनावरें, ह्या सगळ्याची वाटणी होत असे,
आता पद्धत बदलली आहे, एकत्र जमीन कुठ असेल तिकडे एकटा, दुसरीकडे दुसरा, म्हणजे भांडण होऊ नये ही भावना आहे,तरी पण कुरघोड्या चालूच असतात,

म्हणून संस्कार महत्वाचे आहेत, लहान मुलांना आपण काय ज्ञान देतोय हे आपल्या पालकांचे लक्ष पायजे, संगत कुणाची आहे आणि त्यांना काय करायचे आहे, कशात जास्त इंटरेस्ट आहे हे स्वतः पालकांनी समजून घेऊन त्यांना पुढे चाल द्यावी,

उगाच मुलावर बळ जबरी करून पुढे शिकायला घालू नये, ज्यांची कुवत आहे त्यांनी जरूर मुलांना चांगल्या ठिकाणी शिकवावे, शेती साठी नवीन नवीन कोर्स आलेत त्यांनी ते शिकावे, नवीन कॉन्ट्रॅक्ट पद्धती आलेत, ज्यांची जमीन भरपूर आहे त्यांनी स्वतः आपल्या शेतात प्रयोग करावेत,
ज्यांची नाही त्यांनी लिज वर घेऊन करावी, करण्याची तयारी असेल तर काहीही करता येते,

जिद्द असेल तर सहज शक्य आहे.
मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन द्या, अध्यात्म म्हणजे काय हे शिकवा, गावोगावी भुरटे गुरू म्हणून हिंडत आहेत, त्यांच्या मागे न लागता गुरू म्हणजे आपले आई वडील हेच गुरू मानून काम केले तर नक्कीच यशस्वी व्हाल,

भुरट्या आणि ढोंगी बाबा न करता, स्वतः राबल्या शिवाय आणि कष्ट केल्या शिवाय जीवनात यश मिळत नाही हे आपल्या मुलांना शिकवा, आणि फक्त नोकरी नोकरी न करता आता पासून बिझनेस कसा करता येईल हे बघणे,
मग भले त्यात चहा गाडा असो, दूध व्यवसाय असो, शेळी पालन असो,
गावरान कोंबडी पालन असो,अंडी बिझनेस असो, काहीही करा पण न लाजता बिझनेस करावा,
लोक काय म्हणतील म्हणून घरी बसू नका ,

शिका ,खूप मोठे व्हा

काळजी घ्या, पाऊस जास्त आहे, बाहेर जाऊ नका, कॉरोना अजून गेला नाही, ह्या वर्षी धबधबा बघायला गेला नाही म्हणून कोण रुसणार नाही, जिभेला जरा लगाम घाला, सगळे काही सुरळीत होणार आहे,
काही चुकल्यास माफी,
सहज आठवले म्हणून पाठवले
सर्वांना सुखी ठेव देवा

धन्यवाद

Sunday, April 11, 2021

संत तुकाराम


अणुरेणिया थोकडा |

तुका आकाशाएवढा ||१||

या ओळीतच संत तुकारामांचे सूक्ष्मातून प्रचंडाकडे जाणारे समग्र, विस्तृत व व्यापक व्यक्तिचित्र दडले आहे.

ते समजून घेताना सर्वप्रथम महाराष्ट्राचे आद्यदैवत विठू माऊली ,वारकरी संप्रदाय , भक्तिमार्ग या सर्वांचा विचार करावा लागेल.

महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदाय असे दोन संप्रदाय आहेत , त्यात फरक काय ? असाही प्रश्न जनसामान्यांना पडतो . खरेतर

फरक काहीच नाही . वारकरी संप्रदाय श्रीविष्णूला केंद्रस्थानी मानतो तर भागवत संप्रदाय श्रीकृष्णाला..

संप्रदाय माणसाने निर्माण केले. भक्ती, श्रद्धा , विश्वास यामध्ये मात्र कोणताही फरक नाही.

या संतसंप्रदायाचे , भक्तीच्या इमारतीचे वर्णन संत बहिणाबाईंनी अतिशय समर्पक अशा अभंगात केले आहे.

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया।।

नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत।।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।l

आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म सुखासमाधानात व्यतीत व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते . पण ती पूर्ण होत नाही ; सामान्यजनांना हेही समजत नाही की ही सर्व सुखे क्षणभंगुर आहेत ; अनंतातून आलेला प्रत्येक जण अनंतात विलीन होणार आहे आणि जाताना कोणीही आपल्याबरोबर काहीच घेऊन जाणार नाही.

आपण फक्त सत्कर्म करत राहायचे आहे ही गीतेची शिकवण.. तीच संत सज्जनांनी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला..

सामान्यजनांसाठी इहलोकात जन्म घेतला होता सर्वच संतांनी!!

यादवांच्या अस्ताआधी काही वर्षे आणि नंतर पीडित ,शोषित जनता परप्रांतीयांच्या आक्रमणांनी त्रस्त झालेली होती. या जनतेला स्वतंत्र अस्तित्व राहिले नव्हते .अमंगळ भेदाभेद व्यवस्था बोकाळली होती. या भेदाभेदांचा प्रचंड असा त्रास संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना भोगावा लागला पण ज्ञानेश्वरांसारखा योगी पुरुष अशाच भोंदू जनांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी जन्माला आला होता. सोळाव्या वर्षीच भगवद्गीतेचे संस्कृतातील क्लिष्ट सार सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे अवतारकार्य त्यांनी केले. इथेच या भक्ती संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला गेला आणि ह्या इमारतीचा कळस म्हणजे संत तुकाराम ..

जे जे या भक्ती संप्रदायाच्या इमारतीचा भाग बनले आहेत ते सर्वच योगी पुरुष आहेत ,असामान्य आहेत. संत तुकाराम यांचे जीवन चरित्र बघितले तर पदोपदी या योगीयाचे मनुष्यत्व आणि त्याच वेळी माणसातले अलौकिकत्व अनुभवायला मिळते.

संत साहित्याचे अभ्यासक, संशोधक यांच्या संशोधनानुसार संत तुकाराम अतिशय कोमल मनाचे, मृदू वाणीचे धनी होते आणि त्याउलट आवली नावाची त्यांची पत्नी कर्कशा होती.सामान्य माणसाप्रमाणे ते संसार करत होते. संसार करून परमार्थ साधत होते.

लौकिकार्थाने ते एका श्रीमंत घराण्यात जन्मले होते . समृद्ध असे त्यांचे घराणे होते ज्यामध्ये विठ्ठलाची भक्ती परंपरेने चालत आलेली होती . महाजनकी होती.

परंतु काही काळाने अनेक प्रकारच्या अस्मानी सुलतानी आपत्तींना सामोरे जावे लागले.

सतरा अठराव्या वर्षी आई वडील गेले .मोठा भाऊ विरक्ती मुळे तीर्थाटनास गेला.

एका भयंकर दुष्काळाला त्यांना सामोरे जावे लागले .या दुष्काळात त्यांची शेती वाडी, गुरेढोरे सर्व काही गेले ‌उद्योगधंदे ही बुडाले. लोकांना खायला प्यायला अन्नाचा कणही नव्हता‌ अशा वेळी संत तुकारामांनी स्वतःच्या तोंडचा घास लोकांना दिला . गरिबांविषयी त्यांना अतिशय कळवळा होता. संकटाच्या परिस्थितीत कर्जदारांचे कर्ज माफ करून टाकले. या दुष्काळात त्यांचा संतू नावाचा मुलगाही गेला. जीवनाची क्षणभंगुरता त्यांना जाणवली आणि मग चिरंतनाचा ,शाश्र्वताचा शोध सुरू झाला.

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति

रखुमाईच्या पती सोयरिया ll

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

देई मज प्रेम सर्वकाळ ll

तुका म्हणे काही न मागो आणिक

तुझे पायी सुख पूर्ण आहेll

ईश्वरभक्तीतच सर्वकाही आहे हे त्यांना ज्ञात झाले. पण सामान्य जनता सुख-दुःखात गुरफटलेली होती.

परकीयांची आक्रमणे सुरूच होती .गुलामगिरीत समाज स्वत्व हरवून बसला होता . आपलीच माणसं आपसात भांडत होती . सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट केली .भोंदू ,अंधश्रद्ध माणसांनी समाजमनावर ताबा मिळवला होता . काही धर्मवेड्या माणसांनी वेदांमधील ज्ञानाची मक्तेदारी घेतली होत. बहुजन समाज निद्रेत होता .. कर्मकांड, देवभोळेपणा यामध्ये साधी भोळी जनता भरडली जात होती.

समाजाच्या या अडाणीपणाचा फायदा घेतला जात होता .

संत तुकारामांनी याच बहुजन समाजाला जागृत करून त्यांच्या भोळ्या समजुती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभंगातून जनसामान्यांना उपदेश केला.

गिळुन सांडिले कलेवर | भव भ्रमाचा आकार ||२||

सांडिली त्रिपुटी | दीप उजळला घटी ||३||

परमेश्वर चिंतनात त्यांना भव्य साक्षात्कार झाला होता. अज्ञानाचा अंधकार निघून गेला होता. तोच साक्षात्कार सामान्यजनांना मिळावा असा या लोककवीचा उद्देश होता.जगात समता नांदावी , भक्तीचा,अध्यात्माचा , माणुसकीचा खरा अर्थ जनांना समजावा म्हणूनच या जगद्गुरुने संस्कृतातील वेदांचा अर्थ प्राकृत सांगण्याचा प्रयत्न केला.आपल्या पूर्वसुरींचा वारसा चालविण्याचा प्रयत्न केला.

अतिशय सोप्या भाषेतील त्यांच्या अभंगानी आजही जनामनावर ठसा उमटवला आहे.

नाही निर्मळ जीवन

काय करील साबण..

माणसाचे जगणे ,वागणे, स्वभाव वृत्ती, खरे-खोटेपणा यावर सडेतोड प्रहार करणारी त्यांची लेखणी आहे.

आज ज्या पर्यावरणाविषयी जागृत राहण्याचा संदेश आपल्याला दिला जातो तोच संदेश त्यांनी पाचशे वर्षांपूर्वी आपल्या अतिशय सुंदर अशा अभंगवाणीतून दिला आहे .

वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी

पक्षीही सुस्वरे आळविती ll

येणे सुखे रुचे एकांताचा वास

आपलाचि वाद आपणासी ll

माणसाने स्वतःशी संवाद साधावा .इतरांचे गुणदोष ,उणेदुणे न पाहता स्वतःच्या आत्म्याची ओळख करून घ्यावी , असे केले तरच त्याला खरी शांतता मिळेल आणि पर्यायाने जगही सुखासमाधानात नांदेल अशी त्यांची विचारसरणी होती ; जी सर्वत्र आपलीशी होत होती.

काही पाखंडी जनांना हे पटले नाही. तुकारामांच्या अवतार कार्याची जाणीव त्यांना व्हायची होती.

त्यांना उत्तर देताना तुकाराम महाराज म्हणतात ,

करतो कवित्व म्हणाल हे कोणी

नव्हे माझी वाणी पदरीची ll

माझीया युक्तीचा नव्हे हा प्रकार

मज विश्वंभर बोलवितो ll

बोलविता धनी वेगळाचिll

स्वतःला प्रकांडपंडित म्हणवून घेणाऱ्या लोकांनी त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवून टाकण्याचे प्रायश्चित्त घेण्यास सांगितले . परंतु हे अभंग तोपर्यंत जनसामान्यांचे झाले होते. त्यांच्या वाणीत एकरूप झाले होते. मनाच्या मुळापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे जणू काही हे अभंग तरले , इंद्रायणीत बुडले नाहीत असे म्हणता येईल.

खरोखरच तुकारामांचा एकेक अभंग म्हणजे तेजस्वी हिरा आहे . याची प्रचिती नंतर सर्वांनाच आली.

तुकाराम महाराजांच्या लोकप्रियतेची कीर्ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे सोन्या मोत्यांचा नजराणा घेऊन आले त्यावेळी तुकारामांनी त्यांना सांगितले की सोने आमच्यासाठी मातीसमान आहे.

शिवाजी महाराज संत तुकारामांच्या व्यक्तिमत्वाने भारले गेले. स्वराज्य , साम्राज्य सोडून तुकारामांच्या चरणी लीन होण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला .त्यावेळी संत तुकारामांनी शिवाजी महाराजांच्या अवतार कार्याची जाणीव त्यांना करून दिली.

तुकाराम महाराजांचे समग्र चरित्र अभ्यासले तर असे लक्षात येते की त्यांच्यासारखा असामान्य व्यक्तींना खरोखरच खूप त्रास, संकटे भोगावी लागली आहेत.

ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ll

जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ll

या उक्तीप्रमाणे ईश्वराचा अवतार असलेल्या पण मनुष्य रूपात जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला हे भोग आलेले आहेत. प्रत्यक्ष श्रीकृष्ण देखील त्यातून वाचलेले नाहीत.

अजून एक गोष्ट म्हणजे कोणत्याही अलौकिक व्यक्तीची थोरवी ही सामान्यजनांना चमत्काराशिवाय पटत नाही म्हणूनच त्यांचे जीवन चमत्कारांनी भरून टाकण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.

संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीने बुडवल्या नाहीत ; त्या तरल्या..

किंवा संत तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे चमत्कार सगळ्यांनाच माहीत आहेत.

संत तुकाराम हे शेवटी नाहीसे झाले त्यांचा देह कोणाला दिसू शकला नाही किंवा त्या देहाचे सामान्य व्यक्तीप्रमाणे दहन झाले नाही.

संत तुकारामांना नेण्यासाठी स्वर्गातून पुष्पक विमान आले . प्रत्यक्ष देव त्यामध्ये बसून आले होते; ज्यांचे दर्शन समस्त देहूकरांना झाले अशी एक दंतकथा प्रसिद्ध आहे.

त्याविषयी अभ्यासकांच्या मते अनेक वाद विवाद आहेत.

या गोष्टीचा अर्थ असा सांगता येईल की संत तुकारामांनी इतके मोठे कार्य केले आहे की त्यांच्यामुळे माणसातील ईश्वराचे दर्शन सामान्य जनांना घडले.

खरोखरच संत तुकाराम सतराव्या शतकात जन्माला आले ; पण आज पाचशे वर्षांनंतर देखील त्यांचे अभंग जनमानसात रुजले आहेत , त्यांची शिकवण आजही आपल्याला आपल्यातील देवत्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते यातच सर्व काही आले.

तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता ||४||

समस्त मनुष्य जातीवर या संत सज्जनांनी जे उपकार करून ठेवलेले आहेत त्यामुळेच अजूनही समाज रसातळाला गेलेला नाही आणि हे विचार असेच पुढील पिढीपर्यंत पोहोचले तर समाज नक्कीच भवसागर तरुन जाईल आणि हे अभंग गात राहील ..

हेचि दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा ll

गुण गाईन आवडी

हीच माझी सर्व गोडी ll

न लगे मुक्ती धनसंपदा

संत संग देई सदा ll

संत संग देई सदा ll

तुका म्हणे गर्भवासी

सुखे घालावे आम्हासी...ll

                                       प्रांजली अजय आफळे

                                       विद्या प्रबोधिनी प्रशाला

                                       इंग्रजी माध्यम

                                       मोबाईल 9657001835

Email- pranjali.aphale@vppe.bhonsala.in


Saturday, March 13, 2021

मातृत्व

मोबाईलचा आवाज ऐकून मीनाला जाग आली. दुपारच्या वेळी कोणी फोन केला असेल याचा विचार करत ती सावकाश उठून बसली. सात वर्षाचा गौरव जवळच खेळत होता. न सांगताच त्याने मोबाईल आईला आणून दिला.

“ हॅलो, “ मीना सावकाश बोलली.

“ हॅलो मीना! कशी तब्येत आहे ?

“ आता बरी आहे.”

“ मि.राजेश कसे आहेत ?

“ आता तेही ठीक आहेत. अपघातातून वाचले हेच आमचे नशीब म्हणायचे ! पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.”

“ अच्छा ! मीना, मला कसं सांगू कळत नाही. पण सांगणं आवश्यक आहे. काल अमेरिकेतून फोन आला होता. मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ काय ?” मीना किंचाळली. राजेशला जाग आली. तो पडल्या पडल्या संभाषण ऐकू लागला.

“ मीना कुल डाऊन. सांभाळ स्वत:ला. “

“ कायं.. कायं झालं त्यांना अचानक ?”

“ अग मिसेस सॅम्युअलना कोरोना झाला होता. त्या पंधरा दिवसापूर्वी गेल्या. मिस्टर सॅम्युअलना काल हार्ट अँर्टॅक आला. त्यांच्या वकीलाचा फोन आला होता. त्यांनी या महिन्याचे पैसे पाठविले आहेत. पुढच्या महिन्यापासून पैसे पाठवू शकणार नाही, असे कळवले आहे आणि मीना, आता बाळाची जबाबदारी कोणी घेणार नाही तेव्हा बहुतेक तुम्हांला ....”

मीनाला काही सुचेना. ती थरथरायला लागली. तिने फोन कट केला. सुन्न होऊन खुर्चीत बसली. राजेश कॉटवर उठून बसला. आपल्या आईला नेमकं काय झालं आहे गौरवला कळेना. तो भांबावल्या नजरेने आईकडे पहायला लागला.

राजेशने गौरवला सांगितले, “ गौरव, आईला जरा पाणी आणून दे.” गौरवने मीनाला पाणी दिले. पाणी प्यायल्यावर तिला जरा बरे वाटले. ती गौरवला म्हणाली, “ गौरव, थोडावेळ प्रतिकबरोबर खेळायला जातोस का ? तू सकाळी जायचं म्हणत होतासं ना!”


२.

“ माझ्याकडची सापशिडी घेऊन जाऊ का आई? ,“ गौरव म्हणाला.

“ बरं ! ” कसंनुसं हसत मीना म्हणाली. गौरव बाहेर गेला. राजेशने शांतपणे विचारले, “ फोन कोणाचा होता ? नेमकं काय झालं ? ”

मीनाने आवंढा गिळला व म्हणाली, “ अँडव्होकेट कदमबाईंचा फोन होता.”

मीनाला घाम फुटत होता. तिची ती तणावपूर्ण अवस्था राजेशला कळेना. तो म्हणाला, “ तू एवढी का घाबरली आहेस? असं काय सांगितलं त्यांनी?”

मीना दबक्या आवाजात म्हणाली, “ मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ असं कसं होईल? ते पंधरा दिवसापूर्वी बोलले ना तुझ्याशी ?”

“ हो! ते बोलले. त्यावेळी ते थोडे थकलेले जाणवत होते. त्याच कालावधीत मिसेस सॅम्युअल कोरोनाने गेल्या. काल मिस्टर सॅम्युअल हॉर्ट अँटॅकने गेले. या महिन्यात फक्त पैसे मिळणार असं त्यांचा वकील म्हणाला आणि ... “ मीना बोलायची थांबली.

“ अगं आणि काय ? तुझ्या पोटातल्या बाळाचं काय ?” राजेश रागाने बोलला.

“ आता बाळाला कोण स्वीकारणार? ज्याना हवं होत ते तर गेले.”

राजेश आवेशाने म्हणाला,” मीना, अग हे आपलं बाळ नाही. त्यात तुझा-माझा अंश नाही. तू फक्त सरोगेट मदर आहेस.”

मीना भरल्या डोळ्यांनी म्हणाली, “ पण ज्यांचा तो अंश आहे ते आता या जगात नाहीत. “

राजेश तुसड्यासारखा म्हणाला, “ मग त्यालाही या जगात राहायचा अधिकार नाही. जन्माला येण्याआधीच आईबापाला खाणारं हे मूल मीना या घरात नको. “

राजेशच्या या बोलण्याने मीना हादरून गेली. ती काय बोलणार होती. पाच महिन्यापूर्वी राजेशचा अपघात झाला. मित्राच्या बाईकवरून येताना एका ट्रकने त्यांना उडवले. मित्र त्याच वेळी गेला. राजेश मात्र गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. दोन्ही पायाची हाडं मोडली होती. हॉस्पिटलचा लाखो रूपयांचा खर्च कसा करायचा हा त्या वेळी मीनासमोर यक्ष प्रश्न होता. नातेवाईकांनी हात वर केले. अपघाताच्या केस संदर्भात तिची अँडव्होकेट कदमबाईंशी ओळख झाली. मीनाच्या आर्थिक परिस्थितीवर तिने सरोगेट मदर बनण्याचा सल्ला दिला. ज्यांना मूल होत नाही त्यांना आपलं गर्भाशय भाड्याने द्यायचं. सुरूवातीला मीनाने या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. पण एका ऑपरेशनलाच तिचे दागिने, साठवलेले पैसे संपले.



३.

घरखर्च चालवणंही तिला अवघड होतं. अजून राजेशचे दोन ऑपरेशन बाकी होते. तो आपल्या पायावर उभा राहिल की नाही हेही माहित नव्हते. शिक्षण कमी असल्याने मीनाला चांगली नोकरी मिळणं अवघड होतं. वेगवेगळ्या संस्थाकडून मदत मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. पण म्हणावे तसे यश मिळाले नाही. शेवटी धीर एकवटून तिने राजेशला सरोगेट मदर होऊ का विचारले. त्याच्याकडेही दुसरा पर्याय नसल्याने त्याने मंजुरी दिली.

मिस्टर व मिसेस सॅम्युअल दोन दिवसात अमेरिकेहुन आले. कायदेशीरबाबी पूर्ण करून झाल्यावर आठ दिवसात मीनाच्या गर्भाशयात बीजारोपण करण्यात आले. नऊ महिने घरखर्च व बाळाच्या जन्मानंतर पाच लाख रूपये दिले जाणार होते. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि आता अचानक ही बातमी...

मीनाने डोळे पुसले. राजेश म्हणाला, “ हे बघ मीना, जास्त विचार करू नकोस. उद्याच डॉक्टरकडे जा आणि पाडून टाक तो गर्भ. तो आपला नाही आणि खर्चही आपल्याला परवडणारा नाही.”

मीनाने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्यात गौरव आला. आईकडे खाऊ मागायला लागला. मीनाने त्याला डब्यातला चिवडा दिला व ती संध्याकाळच्या स्वंयपाकाला लागली. खाता खाता गौरव मीनाकडे आला व म्हणाला, “ आई आपलं बाळ कधी बाहेर येईल? राजू आपल्या ताईबरोबर खेळतो. सोनू आपल्या दादाबरोबर खेळते. मलाही माझ्या भावाबरोबर खेळायचे आहे. लवकर येईल ना बाळ आई?”

मीनाने आपल्या पोटावर हात ठेवला व म्हणाली, “ अजून पाच महिनेतरी लागतील ; पण तुला त्याच्याबरोबर खेळायला दोन-तीन वर्षे थांबावे लागेल ,” असं म्हणत तिने गौरवचा गालगुच्चा घेतला.

“ ठीक आहे. ते येईल त्या वेळी मी खेळेन, “असं हसून गौरव म्हणाला व उड्या मारायला लागला. त्याचे निरागस विचार मीनाला सुखावून गेले. रात्रभर मीना आपल्या पोटावरून हात फिरवत राहिली. तिला त्या अर्भकाविषयी अचानक प्रेम वाटायला लागले. इतके दिवस ती परक्याचे मूल म्हणूनच विचार करत होती. पण आज त्या निराधार अर्भकाची सरोगेट का असेना आपण ‘ आई ‘ आहोत , याची तिला नव्याने जाणीव होत होती. तिच्यातली आई जागी व्हायला लागली. तिला निराधारांचं मातृत्व स्वीकारणा-या सिंधुताई सपकाळ आठवल्या. सिंधूताईंनी कोण-कुठल्या रस्त्यावरच्या मुलांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतले होते. मग ज्या अर्भकाने आपला संसार पडत्या काळात सांभाळला, त्याला या जगात न आणणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल असे मीनाला वाटायला लागले.



४.

सकाळी मीनाने आपला निर्धार पक्का केला. तिने राजेशला जागे केले व म्हणाली, “ माझा संसार सावरणा-या या बाळाला मी जन्म देणार आणि वाढवणारही. यासाठी मला जे कष्ट करावे लागतील ते एक ‘ आई ‘ म्हणून मी आनंदाने करेन. आता या निर्णयात काही झाले तरी बदल होणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ” उत्तराची वाट न बघता मीना नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. चालताना नकळत तिचा हात पोटावरून फिरत होता.



मंगल कातकर

एैरोली, नवी मुंबई.

whatsapp no. 9757088884

Email: mukatkar@gmail.com

Monday, March 8, 2021

अस्तित्वाची लढाई

अस्तित्वाची लढाई”



वर्ष २०१८ हे वर्ष एक नविन ऊर्जा , चेतना घेऊन आलेले आहे, कारण ही तसेच आहे लग्नाला २५ वर्ष पूर्ण होत आहे..सकाळच्या वातावरणात चालता चालता चर्चेला सूरवात झाली. नवरा आणि मी या विषयावर बोलत बोलत घरी पोहचलो. चहां पीतापीता आयूष्यातील पंचवीस वर्षाचे आँड़िट सुरु झाले.कसे गेलेत पंचविस वर्ष ???? या दरम्यान आम्ही कधीही मागे बघितले नाही .सर्व सामान्य माणसांप्रमाने जगणारी फॅमिली मात्र आधीपासूनच वेगळ्या विचारसरणीची असल्याने पंचविस वर्षात मात्र प्रश्न हे प्रश्न नसुन ते एक चालेंज बनले होते. सर्वात महत्वाचे प्रश्नला आम्ही कधीही “समस्या “हा दर्ज़ा दिला नाही.म्हणतात ना सच्चाईने,स्वाभिमानने, धीटाईने जगन्याचा प्रयत्न केला तर समाज, नातेवाईक , शेजार व इतरजन तुम्हाला वेगळे समजतात . मुलांना सांगीतलेली गोष्ट आठवली , In a row there were many white eggs and one golden egg .The golden egg says ,”they laugh at me because I m different, I laugh at them because they all are same”.

आपण जसे pursue करतो हे महत्वाचे असते. नवर्याचा व्यवसाय असल्याने चूल- मूल हे सांभाळून मी इतर चालेंजेस स्वीकारू लागले . रोज़ नविन नविन शिकने हे जनू रक्तातच होते. ‘गुणवंत आणि नामवंत ‘ यातिल फरक समजू लागला.तूमच्यात गुण असेल तर नामवंत होण्यास वेळ लागत नाही . आयुष्य हे प्रत्येक पायरीवर वेगवेगळे प्रश्न टेस्ट करत असते. त्यात पास झालो तर नेक्स्ट रोऊंड ....


ही नसंपणारी परीक्षा असते.या जड़णघडणात यशाला कूठलाही शाँटकट नसतो, कठोर परिश्रमला कूठलाही पर्याय नसतो. म्हहत्वाकांशी होण्याचे स्वप्न मात्र झोपू देत नाही,त्यात clean n clear मतांची भावना आयुष्यातील व्यवहाराला वेगळी दिशा देत असते. व्यवसायातील चढउतार चालूच होते त्यावर तीन तासाचा picture ही कमी पडेल, पण नविन नविन मेसेज सतत मिळत होते. शिवाजीमहाराज म्हणतात ना परीस्थीतीला दोष न देता जे पुढ़े जातात तेच पराक्रमी असतात.कुणाचीही मदत न घेता आपण जी गोष्ट , जो व्यवहांर ,जे आयूष जगतो त्याला एक वेगळे स्वरुप प्राप्त होते . आयूष्य एक drive असते .....कूठे स्पीड वाढ़वायचे कूठे ब्रेक लावायचे हे शिकवत असते त्याचा अनुभव आपण घेत असतो.एकमेकांना समजणे, साथ देणे , दु:ख काळात जवळ रहाणे कधीही कूणाशी तूलना न करणे.... बघा मग कीती मज़ा येते.


प्रत्येक व्यक़्ती ही special आहे , त्यात स्री ही एक वरदानच ठरली आहे.एका चांगल्या मैत्रिनीमूळे मी माझ्या जीवनातील वेगळ्या प्रयोगाला सुरुवात केली ते म्हणजे सामाजिक कार्य ! मनात आवड असेल तर सवड आपोआपच होत असते . आपले व्याप, प्रश्न , चिंन्ता , आर्थिक परिस्थिति आणि बरेच काही ...... आपल आयुष्य हे ज़ेव्हा दूसर्याचे जगने बघत नाही तो पर्यन्त तुमची किमंत कळत नाही. गेली सोळा वर्ष मी छोठ-मोठ social काम नित्य नियमाने करत आहे आणि करत राहणार आहे.आश्रमात जाणे , खेडयातिल मुलांचे प्रोब्लेम, वसतिगृहातिल मूला-मूलिंच्या समस्या , special child हया वर काम करु लागले... हे करत असतांना माझ्या भावनांवर परिणाम होऊ लागला.आपले ज्ञान कमी पडते असे जानू लागले मग रीतसर मानसशास्र शिकण्यासाठी कॉलेज मधे प्रवेश घेतला . चमत्कार!


माझ्या जगण्याची व्याख्याच बदलली .याचा फायदा व्यवसायात पण होऊ लागला.social work करतांना Empathy n sympathy

ला फरक समजू लागला की तूम्हीच तूमचे बेस्ट counselor बनतात .

ओशो चे बेस्ट कोट आहे ते माझ्या मनाला खूप भावते .....”I m responsible for what I spoke, but not for what you understood.”worry is total waste of time . It doesn't change anything but ....surely keeps us very very busy doing nothing.

एक मूलगा आणि मूलगी असल्याने त्यांचे करीअर निवडण्याचे अधिकार त्यांनाच दिले .मूलगा अमेरीकेत आहे व मूलगी अकरावीत आहे.जीवनाकड़े बघण्याचा दृष्टिकोण कीती अंशाचा ठेवावा हे फ़ार महत्वाचे!

वयाच्या पन्नाशीत ही तोच उत्साह , तीच ऊर्जा कायम आहे ,आतपर्यंत एकही औषधाला बळी पड्ले नाही . रोज़ एका स्मीत हसण्याने सुरुवात करते, नित्य व्यायम , छान रहाणीमान ठेवण्यास प्राधान्य , स्वच्छ परिसर करण्यास हातभार .


पंतप्रधांनाना भेटुन आल्यापासून तर असलेला ऊत्साह द्विगणित झालाय .

पुण्यातील बरेच आश्रम online करायचे प्रयोजन आहे त्याने अन्नधान्य वाया जाणार नाही व गरजही भागेल.जगण्याच्या वेगवेगळ्या पध्दतीने सुखी आणि समाधानि यातिल फरक नक्किच प्रकार्शनाने जानवला.

सुविधानाने सुखी रहाण्यापेक्षा आहे त्या परीस्थीती समाधानी रहाणे हेच योग्य !



सौ.सरिता चितोडकर

कोथरुड

पुणे

8308822931

Saturday, February 27, 2021

https://youtu.be/R23Yam6OZ5A

https://youtu.be/R23Yam6OZ5A

परिसंवाद

https://youtu.be/R23Yam6OZ5A

'* हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!*



*'ळ' अक्षर नसेल तर?*

*पळणार कसे...*

*वळणार कसे...*

*तंबाखू मळणार कसे..*

*दुसर्‍यावर जळणार कसे!*

*भजी तळणार कशी?*

*सौंदर्यावर भाळणार कसे?*

*पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी..?*

*तीळगूळ कसा खाणार?*

*टाळे कसे लावणार ?*

*बाळाला वाळे कसे घालणार....!*

*खुळखुळा कसा देणार?*

*घड्याळ नाही तर  सकाळी डोळे कसे उघडणार ?*

*घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार?*

*वेळ पाळणार कशी ?*

*मने जुळणार कशी ?*

*खिळे कोण ठोकणार ?*

*तळे भरणार कसे ?*

*नदी सागरला मिळणार कशी........!!*

*मनातली जखम भळाभळा वाहणार कशी?*

*हिवाळा, उन्हाळा, पावसाळा....*

*नाही उन्हाच्या झळा*

*नाही त्या निळ्या*

*आभाळातून पागोळ्या खळाखळा....*!

*कळी कशी खुलणार ?*

*गालाला खळी कशी पडणार ?*

*फळा, शाळा मैत्रिणींच्या  गळ्यात गळा....*

*सगळे सारखे, कोण निराळा?*

*दिवाळी, होळी सणाचे काय......?*

*कडबोळी,पुरणपोळी  ओवाळणी पण नाही ?*

*तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?*

*भोळा सांब ,*

*सावळा श्याम*

*जपमाळ नसेल तर  कुठून रामनाम ?*

*मातीची ढेकळे नांगरणार कोण?*

*ढवळे पवळे बैल जोततील कोण?*

*पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?*

*निळे आकाश, पिवळा चाफा...*

*माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !*

*नारळ, केळ, जांभूळ, आवळा,*

*नवर्‍याला बावळट बोलणार कसे*

*काळा कावळा,  पांढरा बगळा*

*ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा*

*अळी मिळी गुपचिळी, बसेल कशी दांतखिळी?*

*नाही भेळ,*

*नाही मिसळ,*

*नाही जळजळ*

*नाही मळमळ*

*नाही तारुण्याची सळसळ*

*पोळ्या लाटल्या जाणार नाहीत.....*

*टाळ्या आता वाजणार नाहीत.....!*

*जुळी तीळी होणार नाहीत.......!!*

*बाळंतविडे बनणार नाहीत......!!*

*तळमळ कळकळ वाटणार नाही....!!*

*काळजी कसलीच उरणार नाही...!!!*

*पाठबळ कुणाचे मिळणार नाही*

*सगळेच बळ निघून जाईल,*

*काळ आला होता पण वेळ आली नव्हती*

*पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !*

*'ळ' अक्षराची माहिती सांगणारा लेख...!*

 *मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 💐💐🚩🚩

Friday, February 26, 2021

मातृत्व (कथा)


मोबाईलचा आवाज ऐकून मीनाला जाग आली. दुपारच्या वेळी कोणी फोन केला असेल याचा विचार करत ती सावकाश उठून बसली. सात वर्षाचा गौरव जवळच खेळत होता. न सांगताच त्याने मोबाईल आईला आणून दिला.

“ हॅलो, “ मीना सावकाश बोलली.

“ हॅलो मीना! कशी तब्येत आहे ?

“ आता बरी आहे.”

“ मि.राजेश कसे आहेत ?

“ आता तेही ठीक आहेत. अपघातातून वाचले हेच आमचे नशीब म्हणायचे ! पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.”

“ अच्छा ! मीना, मला कसं सांगू कळत नाही. पण सांगणं आवश्यक आहे. काल अमेरिकेतून फोन आला होता. मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ काय ?” मीना किंचाळली. राजेशला जाग आली. तो पडल्या पडल्या संभाषण ऐकू लागला.

“ मीना कुल डाऊन. सांभाळ स्वत:ला. “

“ कायं.. कायं झालं त्यांना अचानक ?”

“ अग मिसेस सॅम्युअलना कोरोना झाला होता. त्या पंधरा दिवसापूर्वी गेल्या. मिस्टर सॅम्युअलना काल हार्ट अँर्टॅक आला. त्यांच्या वकीलाचा फोन आला होता. त्यांनी या महिन्याचे पैसे पाठविले आहेत. पुढच्या महिन्यापासून पैसे पाठवू शकणार नाही, असे कळवले आहे आणि मीना, आता बाळाची जबाबदारी कोणी घेणार नाही तेव्हा बहुतेक तुम्हांला ....”

मीनाला काही सुचेना. ती थरथरायला लागली. तिने फोन कट केला. सुन्न होऊन खुर्चीत बसली. राजेश कॉटवर उठून बसला. आपल्या आईला नेमकं काय झालं आहे गौरवला कळेना. तो भांबावल्या नजरेने आईकडे पहायला लागला.

राजेशने गौरवला सांगितले, “ गौरव, आईला जरा पाणी आणून दे.” गौरवने मीनाला पाणी दिले. पाणी प्यायल्यावर तिला जरा बरे वाटले. ती गौरवला म्हणाली, “ गौरव, थोडावेळ प्रतिकबरोबर खेळायला जातोस का ? तू सकाळी जायचं म्हणत होतासं ना!”


२.

“ माझ्याकडची सापशिडी घेऊन जाऊ का आई? ,“ गौरव म्हणाला.

“ बरं ! ” कसंनुसं हसत मीना म्हणाली. गौरव बाहेर गेला. राजेशने शांतपणे विचारले, “ फोन कोणाचा होता ? नेमकं काय झालं ? ”

मीनाने आवंढा गिळला व म्हणाली, “ अँडव्होकेट कदमबाईंचा फोन होता.”

मीनाला घाम फुटत होता. तिची ती तणावपूर्ण अवस्था राजेशला कळेना. तो म्हणाला, “ तू एवढी का घाबरली आहेस? असं काय सांगितलं त्यांनी?”

मीना दबक्या आवाजात म्हणाली, “ मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ असं कसं होईल? ते पंधरा दिवसापूर्वी बोलले ना तुझ्याशी ?”

“ हो! ते बोलले. त्यावेळी ते थोडे थकलेले जाणवत होते. त्याच कालावधीत मिसेस सॅम्युअल कोरोनाने गेल्या. काल मिस्टर सॅम्युअल हॉर्ट अँटॅकने गेले. या महिन्यात फक्त पैसे मिळणार असं त्यांचा वकील म्हणाला आणि ... “ मीना बोलायची थांबली.

“ अगं आणि काय ? तुझ्या पोटातल्या बाळाचं काय ?” राजेश रागाने बोलला.

“ आता बाळाला कोण स्वीकारणार? ज्याना हवं होत ते तर गेले.”

राजेश आवेशाने म्हणाला,” मीना, अग हे आपलं बाळ नाही. त्यात तुझा-माझा अंश नाही. तू फक्त सरोगेट मदर आहेस.”

मीना भरल्या डोळ्यांनी म्हणाली, “ पण ज्यांचा तो अंश आहे ते आता या जगात नाहीत. “

राजेश तुसड्यासारखा म्हणाला, “ मग त्यालाही या जगात राहायचा अधिकार नाही. जन्माला येण्याआधीच आईबापाला खाणारं हे मूल मीना या घरात नको. “

राजेशच्या या बोलण्याने मीना हादरून गेली. ती काय बोलणार होती. पाच महिन्यापूर्वी राजेशचा अपघात झाला. मित्राच्या बाईकवरून येताना एका ट्रकने त्यांना उडवले. मित्र त्याच वेळी गेला. राजेश मात्र गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. दोन्ही पायाची हाडं मोडली होती. हॉस्पिटलचा लाखो रूपयांचा खर्च कसा करायचा हा त्या वेळी मीनासमोर यक्ष प्रश्न होता. नातेवाईकांनी हात वर केले. अपघाताच्या केस संदर्भात तिची अँडव्होकेट कदमबाईंशी ओळख झाली. मीनाच्या आर्थिक परिस्थितीवर तिने सरोगेट मदर बनण्याचा सल्ला दिला. ज्यांना मूल होत नाही त्यांना आपलं गर्भाशय भाड्याने द्यायचं. सुरूवातीला मीनाने या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. पण एका ऑपरेशनलाच तिचे दागिने, साठवलेले पैसे संपले.


३.

घरखर्च चालवणंही तिला अवघड होतं. अजून राजेशचे दोन ऑपरेशन बाकी होते. तो आपल्या पायावर उभा राहिल की नाही हेही माहित नव्हते. शिक्षण कमी असल्याने मीनाला चांगली नोकरी मिळणं अवघड होतं. वेगवेगळ्या संस्थाकडून मदत मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. पण म्हणावे तसे यश मिळाले नाही. शेवटी धीर एकवटून तिने राजेशला सरोगेट मदर होऊ का विचारले. त्याच्याकडेही दुसरा पर्याय नसल्याने त्याने मंजुरी दिली.

मिस्टर व मिसेस सॅम्युअल दोन दिवसात अमेरिकेहुन आले. कायदेशीरबाबी पूर्ण करून झाल्यावर आठ दिवसात मीनाच्या गर्भाशयात बीजारोपण करण्यात आले. नऊ महिने घरखर्च व बाळाच्या जन्मानंतर पाच लाख रूपये दिले जाणार होते. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि आता अचानक ही बातमी...

मीनाने डोळे पुसले. राजेश म्हणाला, “ हे बघ मीना, जास्त विचार करू नकोस. उद्याच डॉक्टरकडे जा आणि पाडून टाक तो गर्भ. तो आपला नाही आणि खर्चही आपल्याला परवडणारा नाही.”

मीनाने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्यात गौरव आला. आईकडे खाऊ मागायला लागला. मीनाने त्याला डब्यातला चिवडा दिला व ती संध्याकाळच्या स्वंयपाकाला लागली. खाता खाता गौरव मीनाकडे आला व म्हणाला, “ आई आपलं बाळ कधी बाहेर येईल? राजू आपल्या ताईबरोबर खेळतो. सोनू आपल्या दादाबरोबर खेळते. मलाही माझ्या भावाबरोबर खेळायचे आहे. लवकर येईल ना बाळ आई?”


मीनाने आपल्या पोटावर हात ठेवला व म्हणाली, “ अजून पाच महिनेतरी लागतील ; पण तुला त्याच्याबरोबर खेळायला दोन-तीन वर्षे थांबावे लागेल ,” असं म्हणत तिने गौरवचा गालगुच्चा घेतला.

“ ठीक आहे. ते येईल त्या वेळी मी खेळेन, “असं हसून गौरव म्हणाला व उड्या मारायला लागला. त्याचे निरागस विचार मीनाला सुखावून गेले. रात्रभर मीना आपल्या पोटावरून हात फिरवत राहिली. तिला त्या अर्भकाविषयी अचानक प्रेम वाटायला लागले. इतके दिवस ती परक्याचे मूल म्हणूनच विचार करत होती. पण आज त्या निराधार अर्भकाची सरोगेट का असेना आपण ‘ आई ‘ आहोत , याची तिला नव्याने जाणीव होत होती. तिच्यातली आई जागी व्हायला लागली. तिला निराधारांचं मातृत्व स्वीकारणा-या सिंधुताई सपकाळ आठवल्या. सिंधूताईंनी कोण-कुठल्या रस्त्यावरच्या मुलांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतले होते. मग ज्या अर्भकाने आपला संसार पडत्या काळात सांभाळला, त्याला या जगात न आणणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल असे मीनाला वाटायला लागले.


४.

सकाळी मीनाने आपला निर्धार पक्का केला. तिने राजेशला जागे केले व म्हणाली, “ माझा संसार सावरणा-या या बाळाला मी जन्म देणार आणि वाढवणारही. यासाठी मला जे कष्ट करावे लागतील ते एक ‘ आई ‘ म्हणून मी आनंदाने करेन. आता या निर्णयात काही झाले तरी बदल होणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ” उत्तराची वाट न बघता मीना नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. चालताना नकळत तिचा हात पोटावरून फिरत होता.


मंगल उमेश कातकर

स्त्री लेखिका